मुख्य सामग्रीवर वगळा

पी. विठ्ठल यांचा लेख

दलित साहित्यातील विद्रोह

Dainik Samana / Mumbai Date : 23 Jan. 2018
.............................................................
दलित साहित्याचा प्रवाह मराठीमध्ये १९६० च्या दशकात रूढ झाला. प्रस्थापित साहित्यव्यवहाराला सर्वार्थाने छेद देणारा आणि अलक्षित अशा सामाजिक वर्तनव्यवहाराला, दलित समाजाच्या सामाजिक दु :खाला अत्यंत सशक्तपणे प्रकट करणाऱ्या या प्रवाहाने चाकोरीबद्ध अशा मराठी साहित्य विश्वात क्रांतिकारक बदल घडवून आणला.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र वैचारिक अधिष्ठानातून आकाराला आलेल्या या प्रवाहाने केवळ मराठीच नव्हे तर एकूणच भारतीय साहित्यालाही एक नवे वळण दिले. हे वळण साहित्यक्षेत्रातील एखाद्या विशिष्ट वर्गातील पारंपरिक वर्चस्वाला छेद देणारे तर होतेच; पण त्याचबरोबर या प्रवाहाने संकेतबद्ध आणि संकुचित अशा वाङ्मयीन सिद्धांताच्याही मर्यादा उघड केल्या. दलित साहित्याने मराठी समीक्षेची, सौंदर्यशास्त्राची संकल्पना बदलून टाकली. कारण या साहित्याने अन्यायमूलक व्यवस्थेच्या विरोधात बंड केले आणि मानवीजीवनाविषयी मोठी आस्था बाळगली. माणसाच्या स्वातंत्र्याचा उच्चार केला, किंबहुना माणूस हाच या साहित्याचा केंद्रबिंदू राहिला. त्यामुळे दलित साहित्याचे एक नवे पर्व इथे उदयाला आले.
   आक्रमक आणि जिवंत भाषेतून व्यक्त झालेल्या दलित साहित्याच्या अभिव्यक्तीने सामाजिक उद्वेगाला, अस्वस्थतेला समोर ठेवले. जाती– धर्माच्या अहंकारात अडकलेल्या उच्चवर्णियांना वास्तवाची जाणीव करून करून देत स्वातंत्र्य, समता व बंधुभाव या तत्त्वत्रयीचा आग्रह धरून नवसमाजनिर्मितीची आस बाळगणाऱ्या या प्रवाहाने मराठी साहित्याला कल्पकतेच्या कलावादी दालनातून बाहेर काढले. वैचारिकदृष्ट्या दुषित असलेल्या धर्मग्रंथाची चिकित्सा केली. या सगळ्या साहित्य व्यवहाराच्या मागे अर्थातच जी ज्ञाननिष्ठा आहे ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची. या तत्त्वविचारातून विद्रोहाचा आविष्कार झाला. हा विद्रोह सामाजिक प्रतिष्ठेसाठी तर आहेच आहे; पण त्याचबरोबर परिवर्तनासाठीही महत्त्वाचा ठरला. आत्मकथन, कविता आणि नाटकांनी दलित साहित्याला एक वेगळी ओळख दिली. कथा, कादंबऱ्या आणि समीक्षेनेही लक्ष वेधून घेतले. नवनिर्मितीचे असे आविष्कार खूप टोकदारपणे उमटत राहिले, परिणामी साठ– सत्तर ते  नव्वदपर्यंतचा काळ हा अक्षरशः दलित साहित्याच्या विद्रोहाने भारावलेला दिसतो.
म.ना.वानखेडे, बाबुराव बागुल, केशव मेश्राम, गंगाधर पानतावणे, यशवंत मनोहर, नामदेव ढसाळ, राजा ढाले यांच्यासारख्या पहिल्या पिढीतील दलित लेखक, अभ्यासक आणि संपादकांनी या प्रवाहाला सशक्त करण्यासाठी हेतुपूर्वक प्रयत्न केले. विषमतावादी व्यवस्थेच्या विरोधात लिहिणाऱ्यांना त्यामुळे प्रेरणा मिळत गेली. दलित साहित्य हा केवळ साहित्यातला एक प्रवाह राहिला नाही. तर समाजपरिवर्तनाची ही एक महत्त्वाची चळवळ ठरली. ही चळवळ आंबेडकरी विचारांनी दिलेल्या आत्मभानातून उभी राहिली. पारंपरिक स्वरुपाची किंवा गुलामी मानसिकता झुगारून देण्यासाठी संपूर्ण दलित समाजाला या चळवळीने मोठी ताकद दिली. शब्द दिला.
जात, धर्म, कुटुंब, विवाह, शिक्षण अशा सर्वच संस्थामध्ये दलित साहित्याने हस्तक्षेप केला. हा हस्तक्षेप म्हणजे भारतीय पातळीवरील एक मोठी क्रांती मानता येईल. कारण हा हस्तक्षेप विचारपूर्वक करण्यात आला. नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ, दया पवार, अर्जुन डांगळे, राजा ढाले, ज.वि. पवार यांच्यासह कितीतरी लेखक कवींनी कवितेसह अन्य साहित्यप्रकारातून जे लेखन केले, त्याने  परंपरेकडे पाहण्याचे एक नवे भान दिले आणि वास्तवाची सुजान दृष्टीही दिली. विशेषतः कविता आणि आत्मकथनांमधून सहज व तितकीच प्रखर अशी जी अभिव्यक्ती झाली ती मराठी साहित्यासाठी सर्वार्थाने नवी होती. शतकानुशतके सामाजिक, आर्थिक परिस्थितीने जी अमानुष अवहेलना या समाजाच्या वाट्याला आलेली होती त्या अमानुषतेविषयीचा एक स्वाभाविक असा हा प्रक्षोभ होता. नकार आणि विद्रोहातून आकाराला आलेला हा प्रक्षोभच दलित साहित्याचे वैशिष्ट्य ठरले किंबहुना याच बाबीमुळे दलित साहित्य हे पारंपरिक साहित्यापेक्षा वेगळे ठरले. अर्थात दलित साहित्याने आपल्या अभिव्यक्तीचे रूप पूर्णपणे नाकारले नाही; पण भाषेच्या, शैलीच्या आणि आशयाच्या अंगाने खूप वेगवेगळे प्रयोग या प्रवाहाने केले आणि त्यामुळे मराठी साहित्यातील प्रस्थापित आणि सांकेतिकतेला बाजूला ठेवून नव्या जीवनमूल्यांची मांडणी करणारे साहित्य म्हणून दलित साहित्याने आपले वेगळेपण सिद्ध केले. या वेगळेपणाची तीव्र जाणीव हीच दलित साहित्याची पृष्ठभूमी आहे.
जीवनवादी समाजभिमुखता हे आणखी एक वैशिष्ट्य सांगता येईल आणि याचे मुख्य कारण म्हणजे सामाजिक चळवळी आणि साहित्य यांच्यातल्या एकत्वामुळे या प्रवाहाने अत्यंत सामर्थ्याने आपल्या जगण्याचे किंवा दलितत्वाचे दर्शन घडवले असे म्हणता येते. स्वातंत्र्योत्तर काळाच्या दोनेक दशकानंतर जे सामजिक परिवर्तनाचे पडसाद महाराष्ट्रात उमटायला लागले त्यामागे दलित साहित्यातील विद्रोह हा विशेष कारणीभूत ठरला. हा विद्रोह सामाजिक विधायकतेसाठी होता, आत्मसन्मानासाठी होता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नव्या युग जाणिवांचा होता. त्यासाठीच नव्या आशयाचे आविष्कारमूल्य यातून प्रकटत राहिले. साहित्याच्या सर्वच प्रकारातून हा विद्रोह प्रकटला. विशेषतः कवितेतील अभिव्यक्ती अधिक टोकदार होती. मुळात हा विद्रोह व्यक्त करण्याची गरज दलित साहित्यिकांना का वाटली? याचा विचार करणे गरजेचे वाटते. निर्मिती कोणतीही असो त्या निर्मितीच्या मुळाशी एक विशिष्ट प्रकारची मूल्यव्यवस्था असते. ही मूल्यव्यवस्था समाजनियंत्रण करत असते. असे नियंत्रण मग समाजातल्या विविध संस्थांवर येवू लागले की माणसाच्या स्वाभाविक जगण्यावर त्याच्या नैसर्गिक हक्क आणि अधिकारावरही निर्बंध लादले जाऊ लागतात. असे घडू लागले की, ‘विद्रोह’अपरिहार्य ठरतो. या विद्रोहातच संघर्षाची बीजे दडलेली असतात.अनुभवाच्या रूपाने हा विद्रोह वर्चस्वाला आणि विशिष्ट स्वरूपाच्या नियंत्रण शक्तीला आव्हान देऊ लागतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि नेतृत्वामुळे एकूणच दलित समाजामध्ये आत्मभानाची जाणीव निर्माण झाली. ही जाणीव दलित चळवळीला पूरक ठरली. तिचे क्षेत्र केवळ साहित्याएवढेच मर्यादित राहिले नाही तर राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांकृतिक क्षेत्राला व्यापून असणारी ही चळवळ दलित समाजाच्या उत्थानासाठी अपरिहार्य अशी गरज ठरली. आधी उल्लेख केल्याप्रमाणे विद्रोहाबरोबरच नकार आणि मानवता ही तत्त्वत्रयी या दलित चळवळीत केंद्रीभूत राहिली.
डॉ. आंबेडकरांनी दलित साहित्यिकांना आवाहन केले होते. याचा निर्देश करणे गरजेचे वाटते. ते म्हणाले होते, “मला साहित्यकारांना आवर्जून सांगायचे आहे की, उदात्त जीवनमूल्ये आपल्या साहित्यप्रकारातून आविष्कृत करा. आपले लक्ष आंकुचित, मर्यादित ठेवू नका. ते विशाल बनवा. आपली वाणी चार भिंतीपुरती राखू नका, तिचा विस्तार होऊ द्या. आपली लेखणी आपल्या प्रश्नापुरती बंदिस्त करू नका. तिचं तेज खेड्यापाड्यातील गडद अंधार दूर होईल असं प्रवर्तित करा. आपल्या देशात उपेक्षितांचं, दलितांचं, दु:खितांचं फार मोठं जग आहे, हे विसरू नका. त्याचं दु:ख, त्याची व्यथा समजून घ्या आणि आपल्या साहित्याद्वारे त्यांचे जीवन उन्नत करण्यास झटा, त्यातच खरी मानवता आहे.” ( संदर्भ : दलित साहित्य : एक अभ्यास, अर्जुन डांगळे )
डॉ. आंबेडकरांच्या या भूमिकेमुळे एकूणच दलित साहित्याला एक मोठे पाठबळ मिळाले. त्याशिवाय त्यांच्या सर्व राजकीय चळवळीमुळे – मग ती चळवळ धर्मांतराची असो की अन्य कोणतीही, दलित साहित्याचे रूप प्रखर बनत गेले. जुन्या जीवनमुल्यांशी केवळ वरवरचा संघर्षच केला नाही, तर या मूल्यांना नाकारण्याचीच भूमिका व्यक्त होऊ झाली. दलित साहित्यातील विद्रोह त्या अर्थाने खूप महत्त्वाचा आहे. नामवंत समीक्षक भालचंद्र फडके यांनी विद्रोहाचे केलेले विश्लेषण यादृष्टीने पाहण्यासारखे आहे. दलित लेखकाला नवा माणूस अभिप्रेत असल्यामुळे त्याची भाषा विद्रोहाची आणि सम्यक क्रांतीची असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विद्रोहाची भूमिका या लेखकांना का घ्यावी लागली तर समाजव्यवस्थेने व्यक्तीविकासाला वाव दिला नव्हता. खरेतर महाराष्ट्रात अनेकदा या स्वरूपाचे विद्रोही स्वर उमटले होते; पण दलित साहित्यातला विद्रोह हा खूप वेगळा होता. फडक्यांनीच म्हटल्याप्रमाणे ‘विद्रोह’ हा मूल्यांच्या प्रतिष्ठापनेसाठी असतो. एक मूल्यसमूह नाकारून नवा मूल्यसमूह अस्तित्वात यावा म्हणून विद्रोहाचा असतो. म्हणून मूल्यभाव नसेल तर विद्रोहाला काहीही अर्थ नसतो. याचाच अर्थ असा की जिथेजिथे प्रतिगामी वृत्ती वाढत जाते, जिथे जिथे मानवतेची विटंबना होते, तिथे तिथे विद्रोह जन्माला येतो. दलित साहित्यातला हा विद्रोह ‘स्वत्व’ शोधासाठी आहे. सत्यदर्शनासाठी आहे.
दलित साहित्याने सामान्यातल्या सामान्य माणसाला नायकत्व दिले. त्याला स्वाभिमानाने उभे केले. कविता, कथा, कादंबरी, आत्मकथने आणि नाटकातून दलित जीवनाचे अनेक पदर आविष्कृत झाले. भूक आणि अस्पृश्यतेसह विविध स्वरूपाच्या अन्याय आणि अत्याचाराची चर्चा पहिल्यांदाच दलित साहित्याने घडवून आणली. अण्णा भाऊ साठे, बंधुमाधव, शंकरराव खरात, बाबुराव बागुल, केशव मेश्राम, अमिताभ यांचे कथेतले योगदान मोठे आहे. दलित जगण्यातील एक भीषण वास्तव या लेखकांनी अत्यंत समर्थपणे मांडले. नामदेव ढसाळ, यशवंत मनोहर, राजा ढाले, अर्जुन डांगळे, दया पवार, वामन निंबाळकर, त्र्यंबक सपकाळे  यांच्यासह अनेक कवींनी कवितेतून जी अभिव्यक्ती केली ती इथल्या संस्कृती आणि परंपरेच्या विरोधातली होती. या विद्रोहालाही अनेक स्तर होतेच. ‘पंधरा ऑगस्ट एक संशयास्पद भगोष्ट’ किंवा ‘माणसं भादरून पेपरवेटमधी कुणी बंद केलीयत’ असे म्हणण्याचे धाडस या कवितेने केले. बंडाची ही एक अपरिहार्य ठिणगी होती.
          ‘सडत होतो आम्ही अगतिक किड्यासारखे
आजपर्यंत.......
  लक्तरात गुंडाळलेली आमची अब्रू
  गोलपिठावर नागविणारांनो
  तुमचा ऱ्हास जवळ आलाय .......
  आम्ही जिवंत झालो आहोत
  तुमच्या पापाचे   छिनाल घट फोडण्यासाठी !’ 

     इतकी टोकदार अभिव्यक्ती मराठी कवितेने पूर्वी पाहिली नव्हती. एका मूक समूहाचा हा आक्रोश होता. हा विद्रोह अनेकांच्या पचनी पडण्यासारखा नव्हता हे खरे; पण तरीही प्रस्थापित मुल्यांचा निषेध करणाऱ्या या प्रवाहाचे जोरदार स्वागत झाले. कारण सामाजिक परिवर्तनासाठी आणि  शोषणमुक्त समाजव्यवस्थेसाठी हा विद्रोह आवश्यकच होता. साठोत्तरी दलित कवितेतून व्यक्त झालेला हा विद्रोह अत्यंत प्रामाणिक आणि एका विशिष्ट भूमिकेतून आलेला होता. सामाजिक अस्वस्थता हे यामागचे मुख्य कारण होते. या अस्वस्थतेने इथल्या संकेतबद्ध व्यवस्थेची चौकट तोडली. नामदेव ढसाळ ते प्रज्ञा पवार असा दलित कवितेचा जवळपास पाच दशकांचा प्रवास आपण पाहिला तर तो खूप वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे  दिसते. प्रत्येक दशकात या कवितेने नवे रूप धारण केले असले तरी ‘ विद्रोह’  मात्र कायम राहिला आहे. आज खूप मोठ्या प्रमाणात कविता लिहिली जात आहे हे खरे; मात्र पूर्वसुरींचा प्रभाव टाळून व्यक्त होणारे कवी किती ? असा प्रश्न विचारला तर फार थोडी नावेच समोर येतात.
दलित आत्मकथनांनी कधी काळे एक मोठे वादळ मराठी साहित्यात निर्माण केले होते. दया पवार, प्र.ई.सोनकांबळे, लक्ष्मण माने, लक्ष्मण गायकवाड यांच्यासह अनेक लेखकांनी मांडलेला जीवनानुभव मराठी साहित्याला नवा होता. दलित स्त्रियांची स्वकथने हाही स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. बेबीताई कांबळे ते उर्मिला पवार अशा कितीतरी लेखिकांनी स्वतःच्या जगण्याविषयीचे विदारक चित्रण केले. कारण कौटुंबिक आणि सामाजिक बंधनांच्या विरोधातला हा विद्रोह स्त्रीच्या भावजीवनाला विस्तारणारा होता. दलित नाटककारांनी दलित जाणिवांची नाटकं रंगभूमीवर आणली. ‘युगयात्रा’ ते ‘कोण म्हणतं टक्का दिला?’ किंवा ‘धादांत खैरलांजी’ पर्यंत प्रकाशित झालेल्या आणि रंगभूमीवर आलेल्या नाटकांनी अनेक प्रश्नावर भाष्य केले. जात जाणिवेचे प्रश्न प्राधान्याने या लेखकांनी मांडले.
  दलित लेखकांच्या पहिल्या दोन पिढ्यांनी अत्यंत सशक्तपणे लेखन केले. विसाव्या शतकाचा उत्तरार्ध त्यांनी अक्षरशः त्यांनी व्यापून टाकला होता. आज काळ बदलला आहे. शिक्षणासह सर्वच क्षेत्रात सामाजिकदृष्ट्या समानता आली असली तरी छुप्या स्वरुपात ‘जात’ अजूनही अस्तित्वात आहेच. आणि जातीसह इतर प्रश्नंही कायम आहेत. उलट आजच्या काळत सर्वच समाजात जातीय आणि धार्मिक अस्मिता अधिक टोकदार झाल्याचे चित्र आहे. अर्थात आता हे प्रश्न केवळ दलितांचेच आहेत असेही नाही. जागतिकीकरणोत्तर काळाने सर्वांपुढेच काही पेच निर्माण केले आहेत आणि त्याविषयीची प्रतिक्रिया उमटत आहे. मात्र जी ठळक ओळख साठ– सत्तरच्या दशकात दलित साहित्याने निर्माण केली होती ती मात्र आज काहीशी पुसट झाली आहे. बदलत्या काळाबरोबर विद्रोहाचे स्वरूपही बदलत आहे. कारण मुख्य प्रवाहाला आणि प्रस्थापित अभिरुचीला धक्का देण्याचे जे काम आधी झाले ते आज अपवादानेच होताना दिसते. असे का झाले ? याचे उत्तर देता येईलही; त्याविषयी पुन्हा कधीतरी बोलूच !

डॉ. पी. विठ्ठल, सहायक प्राध्यापक,भाषा संकुल
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड- ४३१६०६   
मो. ९८५०२४२३३२
इमेल p_vitthal@rediffmail.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हत्तीचा दृष्टांत चक्रधरांच्या दृष्टांतावरून केशोबास यांच्या दृष्टांतपाठ यातील एक दृष्टांत...

दृष्टांतः हत्तीचा दृष्टांतः ।   सर्वत्र म्हणतिले आनंद शक्ती परमेश्वर||: गावा हस्ति आला: ते जात्येंध्ये हस्तीपाहो गेले: एके पाओ देखीला : एके सोंड देखील: एके कांन देखीला: एके ...

मराठीतील दिवाळी अंक

मराठी दिवाळी अंक यादी : अनु.   दिवाळी अंक 1 अक्कलकोटस्वामीदर्शन-दिवाळीअंक 2 अंकुर-दिवाळीअंक 3 अक्षयसार्वमत-दिवाळीअंक 4 अक्षर-दिवाळीअंक 5 अक्षर-दिवाळीअंक- 6 अक्षरअयान 7 अक्षरअयान-दिवाळीअंक 8 अक्षरगंध-दिवाळीअंक 9 अक्षरतेज-दिवाळीअंक 10 अक्षरदीप 11 अक्षरधन-मुंबई 12 अक्षरप्रतिष्ठा-दिवाळीअंक 13 अक्षरप्रभा-दिवाळीअंक 14 अक्षरपान-दिवाळीअंक 15 अक्षरबंध-दिवाळीअंक- 16 अक्षरभेट-दिवाळीअंक 17 अक्षरवैदर्भी 18 अक्षरवेल 19 अक्षरवांग्मय- 20 अक्षरसंवेदना 21 अखंडआनंद-दिवाळीअंक 22 अॅग्रोटेक-दिवाळीअंक 23 अॅग्रोवन-पुणे 24 अणूपुष्प-दिवाळीअंक 25 अंतर्नाद-दिवाळीअंक 26 अंतिमपर्याय-दिवाळीअंक 27 अतिरेक 28 अथश्री-दिवाळीअंक 29 अथश्री-दिवाळीअंक- 30 अदभूतविश्व 31 अद्वैतसृजनवेध 32 अध्यात्मिकव्यापारसरिता 33 अंधश्रद्धानिर्मूलनवार्तापत्र-दिवाळीअंक 34 अंधश्रद्धानिर्मूलनवार्तापत्र-दिवाळीअंक- 35 अंधश्रद्धानिर्मूलनवार्तापत्र-दिवाळीअंक= 36 अधिष्ठान-दिवाळीअंक 37 अनघा 38 अनुदिन-दिवाळीअंक 39 अन्नपूर्णा 40 अन्नपुर्णा-मुंबई 41 अनुप्रिता 42 अनुप्रिती 43 अनुपुष्प-पुणे 44 अनुपुष्प-पु...