क विता म्हणजे निरर्थक बडबड नाही. कविता म्हणजे शब्दांचा फापटपसाराही नाही. शब्दांपुढे शब्द उभे केले की कविता होत नसते, कविता हा अतिशय दुर्घट असा साहित्यप्रकार आहे. सर्व प्रकारच्या कलेचे मुळ कवितेमध्ये आहे. ज्यांना खोल गुहेतला गुढ अंधार पाहता येतो, ज्यांना माणूस, निसर्ग आणि स्वतःबरोबर नाते जोडता येते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्यांना हाका ऐकू येतात तेच उत्तम कविता लिहू शकतात. कवीचे कान नेहमी जमिनीला टेकलेले असावेत. जमीन आतून कायम कुस बदलत असते. तिच्या आतून कधी लाव्हा उफाळून बाहेर येतो तर कधी धरणीकंप होतो. कवीला माता आणि माती यांच्या गर्भाचा अंदाज असावा. - कवी सायमन मार्टिन संकलन : संभाजी हरिभाऊ रोडगे
( मराठीतील काही निवडक कथा क्रमांक:- १ ) १. विदूषक (कथा) : जी.ए.कुलकर्णी (काजळमाया कथासंग्रहातून) विशाल पसरलेल्या द्वादश गोपुरांनी सुशोभित असलेल्या रक्ताक्षीच्या मंदिरावर सुवर्णरंगाचा हंसध्वज मंदपणे थरथरत होता आणि शुभ्र कंदामधून केशरपुष्प उमलल्याप्रमाणे भासत होता. महामंदिराच्या दीर्घ, चित्रवेलीयुक्त अशा पाय-या ओलांडल्यावर खाली अत्यंत विस्तीर्ण असा संगमरवरी मंडप होता आणि त्या ठिकाणी आज राजसभेची योजना झाली होती. अर्धवर्तुळाकार मांडलेल्या अलंकृत आसनावर सर्व अमात्य तर राजवस्त्रात स्थानापन्न झाले होतेच, पण त्याशिवाय आजच्या विशेष प्रसंगी, पर्वतांच्या उतरणीवर राहणा-या वनजनांचे व्याधप्रमूख, सागराशी झुंज देत जगणा-या धीवरांचे नायक, झंजावाताप्रमाणे वनमुक्त संचारणा-या अश्वसमूहांना रजुबद्ध करणा-या अश्वव्यापा-यांचे नेते इत्यादी अनेक मांडलिकही उपस्थित होते. व्याधप्रमुखांच्या अंगावर कृष्णजीनांची आवरणे होती व त्यांनी कानात रुद्र-सुवर्णवलये अडकवली होती. धीवरांच्या अंगावर झगझगीत रेशमी वस्त्रे तंग बांधलेली दिसत होती आणि गुडघ्याखाली त्यांचे पाय उघडे, ओबडधोबड व केसाळ होते....