नोम चॉमस्की (मराठी साहित्य संकलन)
नोम चॉमस्की ७ डिसेंबर २०२० रोजी ९२ वर्षाचे झाले आणि त्यांनी ९३व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यांना भाषाशास्त्रातील पुढील योगदानसाठी खूप खूप शुभेच्छा !
नोम चॉमस्की (७ डिसेंबर १९२८) यांनी आधुनिक भाषाशास्त्राला जन्माला घालून भाषेच्या गुंतागुंतीचा उकल करण्याची भूमिका घेतली. भाषेचा अभ्यास करताना तत्त्वज्ञानाच्या आणि मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून आणि भोवतालचे राजकारण-समाजकारण, निसर्ग अशा अनेक गोष्टींचा संबंध त्यांनी भाषेच्या अभ्यासाला लावला. त्यांचा या क्षेत्रातला आवाका फार मोठा आहे. हे सारे करताना त्यांनी भाषेच्या पारंपरिक चौकटीला छेद दिला आहे. उजवा किंवा डावा कोणताही विचार असो, लोकांच्या जनचळवळींचा नेमक्या सामाजिक आणि राजकीय आशयावर, वर्मावर बोट ठेवून, ठाम भूमिका घेऊन त्यांनी भाषेचा अभ्यास मांडला आहे.
भाषेच्या संदर्भात अकादमीय डिस्कोर्समध्ये भाषा ही संप्रेषणाचे प्रमुख साधन आहे, असे नेहमी म्हटले जाते (Language is a tool of communication), हे खरे आहे का? वरवर पाहता भाषेची ही व्याख्या आपणांला अगदी खरी वाटते. पण प्रत्यक्षात तसे नाही. चॉमस्की यांनी भाषेची अगदी नेमकी उलटी व्याख्या केली आहे. हे खासकरून भाषेचे त्यांचे देरिदीयन (Like Derrida) दर्शन आहे. Language is not a tool of communication but a tool of miscommunication, or at times, discommunication असे चॉमस्की यांचे भाषेबद्दलचे खूप प्रसिद्ध निरीक्षण आहे. भाषा ही केवळ संप्रेक्षण म्हणून वापरली जात नाही, तर ती आपल्या अनेक समस्या सोडवण्यासाठीही वापरली जाते.
'आपणांस काही सांगायचे नाही', ही गोष्टही भाषा नावाच्या सांस्कृतीक परिप्रेक्ष्यात खूप महत्त्वाची असते. आपल्या जीवनात समस्या सोडवण्यासाठी आपण भाषेचा वापर कसा करतो? हा प्रश्न चाॅमस्की यांना खूप महत्त्वाचा वाटतो. म्हणून चाॅमस्की यांनी भाषा ही संप्रेक्षणासाठी वापरली जात नाही, तर तिचा उपयोग हा बऱ्याचदा संप्रेक्षण पुढे ढकलण्यासाठी किंवा वेगळाच मेसेज जावा (miscommunication, discommunication) यासाठीही केला जातो असे वाटते.
अलीकडे भाषेच्या वापरावरून (Language Use) लिंगभेद (Gender Difference) या विषयावर चर्चा होत असते. वास्तविक या विषयाला उत्तर संरचनावादाच्या (Poststructuralism) आरंभानंतर अधिक चालना मिळाली. झाक देरिदा, जुलिया ख्रिस्तेवा, जॉन्सन बार्बरा या समीक्षकांचे या क्षेत्रातील काम अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे. स्त्री पुरुषांत होणारा भाषिक व्यवहार (man-woman binary opposition, द्विपदी विरोध) कसा असतो? हा या डिस्कोर्सचा मुख्य गाभा आहे. बहुतेककरून आपण असा विचार करत नाही. आपल्या जाणिवांवर पितृसत्तेचा पगडा इतका जबरदस्त असतो की, आपण असा विचारच करू शकत नाही. याबद्दलच्या आपल्या सार्या भाषिक खिडक्या पुरुषसत्ताक शक्तीने गच्च बंद केलेल्या असतात. स्त्रियादेखील या प्रभावाच्या बळी असतात. पुरुषाची अरेरावी स्त्रियांना म्हणूनच फारशी खटकत नसावी. स्त्रियांमध्ये पुरुषाबद्दल अत्यंत स्वामित्वाची भावना असायला पाहिजे, अशी समाजाची आणि पुरुषसंस्कृतीची धारणा आणि अपेक्षा असते.
मालवून टाक दीप
चेतवून अंग अंग
राजसा किती दिसात
लाभला निवांत संग
सुरेश भटांचे हे प्रसिद्ध शृंगार रसाने भरलेले गीत पाहिले तर आपणांस काय आढळते? हे गाणं पुरुषांने लिहिले आहे, पण यातील कल्पित निवेदिका, ही स्त्री आहे. इथे पुरुषाला स्त्रीकडून अपेक्षित असलेली स्वामित्वाची भावना व्यक्त झाली आहे. मराठी साहित्याचा अभ्यास करणार्या तरुण संशोधकांना साहित्यामध्ये पुरुष स्त्रीच्या संदर्भात कशी भाषा वापरतो (किंवा उलटेही), हा एक मोठा संशोधनाचा विषय होऊ शकतो.
भाषेच्या वाच्य रूपाचा विचार केल्यास, निरर्थक बोलत राहणे, थापा मारणे, भाषिक रॅगिंग करणे, शिवीगाळ करणे, मौन पाळणे, काहीच न बोलणे अशी अनेक उदाहरणे आपल्या समोर येतात.
भाषेच्या लिखित रूपाचा विचार केल्यास, अर्थ दडवण्याचा प्रयत्न केला जातो, हे बहुतेकदा कलेच्या क्षेत्रामध्ये अधिक प्रकर्षाने प्रतिबिंबीत होते, सैद्धांतिक लेखन, गूढ रम्य लेखन, ललित लेखन, कायद्यात वापरली जाणारी भाषा वगैरे अशी अनेक उदाहरणे यासंदर्भात देता येतील. अर्थातच वाच्य रूपातील भाषिक हिंसा ही लिखित रुपातील भाषिक हिंसेपेक्षा तीव्र आणि भयावह असते. सिनेमा आणि नाटक अशा कलात्मक (वाच्य) अभिव्यक्तीमधून भाषेचे हे हिंसक दर्शन अत्यंत प्रभावीपणे होत असते.
कायद्यात वापरली जाणारी भाषा कशी असते? याची अनेक उदाहरणे आपणांला देता येतील. थोडे विषयांतर होऊ शकते पण एका उदाहरणाची थोडक्यात चर्चा करूयाच. श्याम बेनेगल यांचा 'आरोहण' (१९८२) या शीर्षकाचा एक सिनेमा आहे, तो फारसा लोकप्रिय सिनेमा नसल्यामुळे सर्वसामान्य सिनेरसिकांना तो परिचित असण्याची शक्यता कमी वाटते. चाॅमस्की यांच्या भाषेबद्दलच्या देरिदियन दर्शनाची प्रचिती या सिनेमातल्या एका न्यायालयाच्या दृश्यात आहे.
हरी मंडल या अल्पभूधारक वेठबिगार शेतकऱ्याची ही कथा आहे. जमीनदार अशा अल्पभूधारक शेतकऱ्यांचे शोषण करत असतात. त्यांना कर्ज देऊन त्यांच्या जमिनीवर मालकी प्रस्थापित करतात. हरी मंडल आपल्याच जमिनीची मालकी न्यायालयात सिद्ध करू शकत नाही. न्यायालयाची भाषा इंग्रजी आणि हरी मंडलची भाषा ही स्थानिक असते. ही केस आपल्या गावातील संघटनांच्या सहाय्याने हरी लढतो. न्यायालयाच्या इंग्रजी भाषेतून त्यांच्या वकिलाशी झालेला संवाद हा अत्यंत मृत (??) अशा स्वरूपाचा संवाद असतो, याला शैलीशास्त्रात Frozen Style अशी संज्ञा वापरली जाते. इंग्रजी भाषेमुळे हे अंतर निर्माण करणे आणि ते सातत्याने टिकवणे हे अधिक शक्य होते. न्यायालयांमध्ये झालेल्या चर्चेत कोणत्याही प्रकारचे कम्युनिकेशन (communication) होऊ नये किंवा अधिकतर miscommunication किंवा discommunication व्हावे, कोणताही निर्णय होवू नये, तो पुढे ढकलता यावा असाच उद्देश हा कायद्याच्या भाषेचा असतो. अशा प्रकारची अनेक उदाहरणे आपल्याला इतरही वाच्य आणि लेखन अभिव्यक्तीमधून सुध्दा पहायला मिळतात.
भाषेबद्दल, भाषेच्या वापराबद्दल, आणि एकूणच भाषिक राजकारणाबद्दल चाॅमस्की यांनी आपणांस सजग केले आणि याबद्दलची दार्शनिक चर्चा होऊ शकते याचा आत्मविश्वास जगभरातल्या भाषा अभ्यासकांमध्ये निर्माण झाला, यात चाॅमस्की यांचे योगदान अभूतपूर्व असेच आहे, असे मानायला हवे
( दीपक बोरगावे यांच्या फेसबुक वरुन साभार)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा