प्रसिध्द मराठी कवी
श्रीकांत देशमुख यांच्या
‘ बोलावे ते आम्ही..’
या काव्य संग्रहास सर्वोत्कृष्ट मराठी कलाकृतीचा वर्ष २०१७ चा मराठी साहित्य अकादमी पुरस्कार आज जाहीर करण्यात आला आहे.
सर्वोत्कृष्ट मराठी कलाकृतीच्या पुरस्काराचे स्वरूप १ लाख रूपये, ताम्रपत्र आणि शाल असे असून पुढील वर्षी १२ फेब्रुवारी २०१८ रोजी या पुरस्काराचे वितरण होणार आहे. मराठी साहित्यातील पुस्तक निवड समितीमध्ये प्रसिध्द साहित्यिक जयंत पवार, पुष्पा भावे आणि सदानंद देशमुख यांचा समावेश होता.
‘बोलावे ते आम्ही..’ हा श्रीकांत देशमुखांचा जुन्याच पिडीतील नवा कवितासंग्रह आहे. गावगाडयाचा बदलता अवकाश अतिशय व्यामिश्र रूपात कवेत घेणारा हा नव्वदोत्तर कालखंडातील एक महत्वाचा काव्यसंग्रह आहे. कृषीजन व्यवस्थेला वेढून टाकणारी, आक्रमित आणि संस्कारित करणारी बाहय व्यवस्था ही देखील या काव्य संग्रहाच्या चिंतनाचा विषय आहे. या संग्रहात पाच विभाग आहेत.
६८ कवितांचा हा संग्रह खोलवर विचार करायला लावणारा आहे. या संग्रहात भौतिकतेपेक्षा पिंडधर्माकडे लक्ष वेधण्यात आले आहे. जन्मजात सोशिकता हाच बळिवंताचा पिंडधर्म आहे, हे कवीने सांगितले आहे. जन्म, मरण, अब्रू, बाप, पाटील, झाड, डुक्कर, मोर, समुद्र, मुंबई, अडत, अडत्या, गाडया, समाधी या गोष्टी कवीच्या कथनपर कवितेत येतात. माती, रेत यांद्वारा विश्वाच्या पोकळीमध्ये अविरत नवसर्जन घडते.
‘उजळमाथ्यानं भूमिपुत्र’ या भागात कवीला भविष्याविषयीचं दु:स्वप्न पडतं. उंदरा-कोल्ह्यानं हंगाम नष्ट करू नये म्हणून शेतकरी डोळ्यांत तेल घालून पहारा करतो. पण त्याची पुढची पिढी मातीपासून दूर होत आहे, हे ही या काव्यसंग्रहात सूचकपणे आविष्कृत केले आहे.
रवींद्र भवनस्थित साहित्य अकादमीच्या मुख्यालयात आज साहित्य अकादमीच्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. साहित्य अकादमीचे सचिव डॉ. के. श्रीनिवास राव यांनी देशातील २४ प्रादेशिक भाषांतील विविध साहित्य प्रकारात सर्वोत्कृष्ट साहित्यकृती व लेखकांच्या नावाची घोषणा केली. प्रसिध्द मराठी कवी श्रीकांत देशमुख यांच्या
‘ बोलावे ते आम्ही..’ या काव्य संग्रहाची मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट पुस्तक म्हणून निवड करण्यात आली.
- मराठी साहित्य संकलन
_rodgesh@₹valgaonkar.selu/pbn
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा